Wednesday, July 13, 2016

          मी निरीक्षण करतो आहे बरेच दिवस, बरेच महिने कदाचित काही वर्षे देखील झाली असतील; त्यांचे आणि तुमचे. मी यात तुमच्यातच आहे. तुम्ही गुंग आहात तुमच्यातच तुम्ही स्वतःचा असा कोश निर्माण करून घेतलाय. तुम्ही एका हस्तिदंती मनोऱ्यात अगदी मजेत, सुरक्षित आहात. तुमच्यासमोरही प्रश्न आहेत म्हणा पण ते तुमचे आहेत, तुमच्यापुरते आहेत, तुमच्यासाठी आहेत. मला याच वाईट वाटत आहे. तुम्ही एका समाजाचे भाग आहात. तुमची समाजाची काही उसनवारी आहे हे तुमच्या ध्यानी मनी देखील नाही. याच वाईट वाटत आहे. खूप वाईट वाटत आहे म्हणून हा उसासा लिहितो आहे.
         तुम्हाला ठाऊक आहे घाण, दुर्गंधी काय असते? हो हो तीच जेव्हा तुम्ही गटाराशेजारून जाता आणि उग्र वासाने नाक भरून गेल्यावर नाकावर हात ठेवता. जिथ तुम्ही श्वास घेऊ शकत नाही त्याच्या शेजारी-पाजारी माणसे कशी रहात असतील? कधी विचार केलात का? साताऱ्याच्या कामाठीपुरयातून येता-जाता मला हाच प्रश्न सारखा पडतो. मला भीती वाटते खरतर घाणीची. घाण पहिली कि माझ्या अंगावर शहारे येतात, रात्री स्वप्नात सुद्धा तीच घाण येऊन मी दचकतो. मला या भीतीला जिंकायचं आहे आणि तुम्हाला? त्या घाणीच्या शेजारी लोक का राहतात? कसे राहतात? हा विचार तुम्हालाच करायचा आहे.
         तुम्हाला माहित आहे मुंबईसारख्या मोठ्या शहरात कामगार कसे राहतात? एकाच खाटेवर तीन शिफ्ट मध्ये झोपण्याची पद्धत तुम्हाला ठाऊक आहे काय? तुमच्या पाय ठेवला तर किमान इंचभर खाली रूतणाऱ्या गादीवर कदाचित कानात कॉड घालून तुम्ही डान्स केलेला असेल हो ना? मात्र त्याबरोबर तुम्ही कधी त्या कामगारांचा विचार केला का? प्रचंड डास आणि ढेकुण असणाऱ्या खोलीत तुम्ही कधी झोपलाय का? अंथरुणाला पाठही टेकू न देणारी ती रात्र मी अनुभवलीये, रोज अशी रात्र अनुभवणाऱ्यासाठी तुम्ही काही करणार आहात कि नाही? तुम्ही भर रात्री कधी बस किंवा रेल्वे स्टेशन वर गेलाय का? नक्कीच गेला असाल त्यावेळी तिथ झोपणाऱ्या लोकांची घरे कशी असतील? असतील कि नाही? याचा विचार कधी तुमच्या मनाला शिवला कि नाही? केला नसेल तर तो करायला हवा ना?
          नाही नाही नाही ! तुम्ही सुखवस्तू आहात, आनंदात आहात, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी पुरेशा आहेत म्हणून माझा राग नाही, त्रागा नाही. तुम्ही जसे जगता आहात, तुम्हाला जसे आयुष्य लाभले आहे ते त्यांच्या वाट्याला का नाही? हा माझा प्रश्न आहे. त्याचे उत्त्तरदायित्व तुम्ही घेणार कि नाही? तुम्ही म्हणाल मग त्यांच्या प्रश्नाशी आमचा काय संबंध? त्यांच्या अधोगतीला ते जबाबदार आहेत आमचा संबंध काय? असेच एक मजेशीर वाक्य काल वाचनात आले. दारिद्रयाचे कारण दारिद्रय स्वतःच आहे. वाईट याच वाटत कि ते पुस्तक जुन्या MA एकोनोमिक्स च्या अभ्यासक्रमाचे होते. आपल्याला हेच शिकवलं जात का? आपला याच्याशी खरच काही संबंध नाही काय?
         तुम्हाला रेडियम असणारी घड्याळे आवडतात का? अरे वा! तुम्ही टी पहिली आहेत कदाचित घातली देखील असतील, अंधारात किती छान चमकतात ना ती? पण त्यावर रेडियम लावण्यासाठीचे कुंचले ओठाने सरळ करावे लागायचे त्यातून कित्येक महिला कामगारांना कर्करोग झाला होता. त्या महिलांचा आणि तुमचा काहीच संबंध नाही काय? तुमचे घर बांधण्यासाठी सिमेंट जरूर वापरले असेल ना? आणि सुंदर फरशा देखील. हे सार सिमेंट, फरशा आणि रोजच्या वापराच्या मिरच्या रेल्वेतून उतरवणाऱ्या हमालांचे सरासरी वयोमान ४५ पेक्षा कमी आहे हे तुम्हाला ठाऊक आहे काय? तुमच्या घरातल्या फरशा वाहताना त्या पडून हात पाय गमावलेले कित्येक हमाल तुम्हाला पुण्याच्या हमाल वस्तीत मिळतील, त्यांचा आणि तुमचा काहीच संबंध नाही काय? तुम्ही कीबोर्ड हो कम्प्युटर कीबोर्ड वापरत असालच ना? तो कीबोर्ड तयार होणाऱ्या एक चीनी कंपनीत कामगारांकडून कसे काम करवून घेतले जाते तुम्हास ठाऊक आहे का? १२ तास ड्युटी आणि चार्ली चाप्लीनच्या modern times सारखे फक्त अक्षरे टाकण्याची कृती करणारे कामगार आणि कुलुपबंद factory त्यांचा आणि तुम्हा कीबोर्ड वापरणारांचा काहीच संबंध नाही काय? अशी किती उदाहरणे देऊ? पुण्यातील गटारगंगा झालेली मुळा-मुठा नदी; तिच्यात घाण पाणी सोडणाऱ्या कंपन्याचे आपण ग्राहक नाही काय? मग या सर्वांशी जोडले गेलेले आपण या विषयी विचार करायला हवा ना?  आणि समजा नसू आपण जोडलेले या सर्वांशी तरीही माणूस म्हणून आपण दुसऱ्या माणसाचा विचार करणार कि नाही?
          आपण आता स्वतःला फुलपाखरू बनवायला हव त्यासाठी आपण आपले सारे कोश सोडायला हवेत, या प्रक्रियेत वेदना येतील अडचणी येतील पण हे करायला हव, फुलपाखरू होण्यासाठी या निसर्गातल एक सुंदर प्रतिक सौंदर्याच; आपण माणुसकीच देखील बनवूयात. हे सारे प्रश्न जेव्हा आपल्याला आपले वाटायला लागतील ना तेव्हाच आपण याची उत्तरे शोधायला सुरुवात करू, यातही एक संघर्ष उभा राहील प्रथम स्वतःविरुद्ध स्व मधील बदलासाठी असेल आणि नंतर या सर्व माणुसकीला काळिमा फासणाऱ्या गोष्टींच्या विरुध्द.... या साऱ्याला सुसंगत अस एक गीत
                      माणुसकीच्या शत्रू संगे युध्द आमुचे सुरु....
हे आपली नांदी ठराव इतकीच आशा.